सुधाकरराव कुलकर्णी हे माझे अतिशय जीवश्च कंठश्च मित्र ! माझ्या या मित्राची आठवण म्हणजे आम्ही मिळून केलेल्या कामाचा आमच्या जीवनामधील अतिशय रम्य भाग आहे. विशेषतः योगेश्वरी शिक्षण संस्थेच्या माजी विद्यार्थी संघटनेच्या स्थापनेचे मोठे श्रेय त्यांना जाते. मात्र, सेवेत असताना आणि नंतरही आम्ही शिक्षकांसाठी अनेक कामे केली. पैकी ‘शिक्षक भवना’ची उभारणी आम्ही फार चिकाटीने आणि प्रसंगी संघर्ष करून, पण यशस्वीरित्या केली. शिक्षण विस्तार अधिकारी व मुख्याध्यापक म्हणून सुधाकरराव यांनी केलेले कार्य अद्वितीय असे होते. दै.’विवेकसिंधु’ मधून त्यांनी त्यांना अस्वस्थ करणाऱ्या अनेक गोष्टींबद्दल सातत्याने लिहिले, त्यांत शिक्षक, शिक्षण आणि त्यांचा सर्वांगीण विकास, चारित्र्यवृद्धी, कार्यनिष्ठा, आत्मसन्मान व आत्मविश्वास हेच कार्यबिंदू राहिले. त्यांच्या पश्चात त्यांचा कार्यावर व त्यांच्या तळमळीवर विस्मृतीचे सावट येवू नये, म्हणून आणि त्यांच्या स्मृतींच्या माध्यमातून त्यांच्या मनातले कार्य काही अंशाने का होईना साधण्याचा प्रयत्न करण्यासाठी प्रतिष्ठानची स्थापना करण्यात आली आहे. सचोटी हा मूलमंत्र घेवून ज्याप्रमाणे सुधाकरराव कुलकर्णी यांनी कार्य केले, तोच मूलमंत्र घेवून प्रतिष्ठान कार्य करीत आहे, याचे समाधान आहेच. पण समाजाच्या समस्या पाहता, अजून खूप वाटचाल करायची आहे. शिक्षण हा सर्वात मोठा आशादायी किरण आहे. त्याच्या माध्यमातून वाटचाल करताना अनेक गुंतागुंतीचे प्रश्न समोर येतात. ते सोडवण्यासाठी आजवर सर्वांचे पाठबळ लाभले आहे. ते असेच लाभो. त्यासाठी अधिकाधिक समाजाभिमुख व लोकाभिमुख होण्यासाठी आज दि. १ मे, २०२० रोजी, महाराष्ट्र दिन व कामगार दिनाचे औचित्य साधून, हे संकेतस्थळ सुरु करताना विलक्षण अभिमान वाटतो. आनंदही होतो आहे. या माध्यमातून अधिकाधिक देणगीदार, हितचिंतक, सहकारी यांच्याशी हितगुज होईल. अनेकांचे हात लागतील. अनेकांची साथ लाभेल ह्या अपेक्षेने, महाराष्ट्र दिनाच्या व कामगार दिनाच्या शुभेच्छा देतो आणि सहकार्याची अपेक्षा करतो.