सुधाकरराव कुलकर्णी स्मृती...

मनोगत …..
२००९ साली सुधाकरराव कुलकर्णी यांचे अकस्मात निधन झाले.
कुठल्याही गोष्टीत, कुठल्याही उपक्रमात झोकून देवून, झपाटूनच कार्य करण्याची वृत्ती असल्यामुळे जवळपास ३५ वर्षांच्या सेवेनंतर ते निवृत्तीनंतरही शिक्षणविषयक सामाजिक कार्यात प्रत्यक्ष कार्यरत राहिले. वरकरणी सामान्य शिक्षक, मुख्याध्यापक असूनही शिक्षणाविषयीची त्यांची श्रद्धा, आस्था व तळमळ कुठल्याही महान व्यक्तीपेक्षा कमी नव्हती. उलटपक्षी, प्रत्यक्ष कार्य पाहता, ती काकणभर अधिकच होती. विशेषत: विद्यार्थी आणि शिक्षक यांची सर्वांगीण उन्नती आणि चारित्र्यवर्धन हा त्यांचा जिव्हाळ्याचा विषय होता. त्याच्यासाठी त्यांचे अहोरात्र चिंतन, लेखन आणि वाचन चालू असे. त्यासाठी ते अनेक अभिनव कार्यकल्पना आखून अंमलात आणीत. उदाहरणार्थ – इतिहास, भूगोल शिकवणाऱ्या शिक्षकांना किमान महाराष्ट्र, किल्ले, ऐतिहासिक ठिकाणे, महाराष्ट्रातील थोर व्यक्ती यांची चरित्रे माहित असली पाहिजेत; या त्यांच्या ध्यासातून कित्येक वर्षे ग्रामीण भागातील शिक्षकांच्या अनेक सहली घडल्या. कित्येकांचे सत्कार, सन्मान आयोजित झाले. खेड्यात, तांड्या-वाड्या-वस्त्यांवर काम करणाऱ्या सेवादक्ष शिक्षकांवर ते अनेक निमित्ताने लेख लिहित आणि त्यांना हुरूप, स्फूर्ती, प्रेरणा देत. तशी ही यादी खूप मोठी होईल. त्यांच्या उपक्रमशीलतेबद्दल प्रत्यक्ष कुसुमाग्रज आणि वि. वि. चिपळूणकर यांनी त्यांचा पत्राद्वारे गौरव केला होता. अंबाजोगाईची योगेश्वरी शिक्षण संस्था आणि तिथली अभिजात शिक्षण परंपरा यांचे त्यांना विलक्षण निष्ठा, आदर, कृतज्ञता होती. खेडेगावाहून आल्यानंतर जे शिक्षण, जे संस्कार मिळाले आणि ज्यामुळे आपण एक उत्तम शिक्षक, नंतर विस्तार अधिकारी आणि शेवटी जि. प. कन्या प्रशालेचे मुख्याध्यापक होवू शकलो, याचे या संस्थेचे ऋण कसेकसे फेडावे आणि त्याचबरोबर जवळून शिक्षण क्षेत्र पाहत, तपासत असताना या संस्कारांची शिदोरी कुठकुठवर पोचवणे अत्यावश्यक आहे, त्यासाठी धडपड करण्याचे त्यांचे इप्सित त्यांनी साकारायला सुरुवात केली. त्यामुळे ते निवृत्तीनंतर कार्यात उतरले. योगेश्वरी शिक्षण संस्थेच्या माजी विद्यार्थ्यांची संघटना स्थापन करण्यात त्यांचे अतिशय मोलाचे योगदान होते. हजारो माजी विद्यार्थ्यांना आस्थेवाईकपणे स्वत:च्या हस्ताक्षरात त्यांनी पत्रे लिहिली व संघटनेच्या उभारणीत योगदान देण्याचे आवाहन केले. त्यातून माजी विद्यार्थ्यांचे जाळे उभे राहिले.
मा. प्रा. नानासाहेब गाठाळ, पी. एस. कुलकर्णी, व्ही. एन. कुलकर्णी, प्राचार्य दादाहरी कांबळे अशा मान्यवर ज्येष्ठांसह कितीतरी तरुण मंडळी निष्ठेने त्यांना साथ देत राहिली. राजकीय नेते मा. राजकिशोरजी मोदी यांच्या संस्थेत त्यांनी स्वयंस्फूर्तीने काम केले. मोदी यांनी त्यांच्यातली तळमळ, नि:स्वार्थ आस्था, निर्व्याज धडपड ओळखली होती. बाबांनी त्यांना अनेक धोरणात्मक बाबींत जे मोलाचे मार्गदर्शन केले, योग्य सल्ला व प्रसंगी प्रत्यक्ष सहकार्य केले, याचे स्मरण त्यांनी ठेवले आणि त्यांना मूकबधीर विद्यालयात व इतर घटक संस्थांत अनौपचारिकपणे सामील करून घेतले. त्या विद्यालयांतील शिक्षकांनीही बाबांच्या मार्गदर्शनाचा स्वीकार केला आणि त्यांना कामाचा आनंद दिला. विशेषत: मूकबधीर विद्यार्थ्यांची त्यांना विशेष कणव येत असे. निसर्गाने ध्वनीशी ज्यांचे नातेच तोडले आहे अशा दुर्दैवी, निष्पाप मुलांच्या चेहऱ्यावरील केविलवाणेपण त्यांना बेचैन करीत असे.
त्यांची धडपड व बांधिलकी स्मरणात ठेवून, त्यांच्या स्मृतीदिनानिमित्त त्यांच्या सामाजिक योगदानाची प्रेरणा कायम ठेवण्याच्या हेतूने कार्य करायचे ठरवले. पहिल्या स्मृतिदिनानिमित्त बाबांनी दै. ‘विवेकसिंधु’ या स्थानिक वृत्तपत्रातून सदोदित बांधिलकीने, पोटतिडीकीने व हक्काने जे लिखाण केले, त्या लिखाणाचे संकलन केलेल्या – ‘शिक्षणसिंधु’ व ‘प्रभासकिरणे’ – या दोन ग्रंथांचे शिक्षक आमदार विक्रमजी काळे यांच्या उपस्थितीत, विचारवंत जयदेव डोळे यांच्या हस्ते केले. यांपैकी, ‘शिक्षणसिंधु’ हा ग्रंथ तर शिक्षण खात्याने शिफारस केलेल्या पुस्तकांच्या यादीत समाविष्ट झालेला आहे. दुसऱ्या वर्षी त्यांच्या ‘विवेकानंदांचे शैक्षणिक विचार’ या पुस्तिकेचे परळी येथील आमचे स्नेही व लोकप्रिय उदारमतवादी राजकीय नेते बाळासाहेब देशमुख, बाबूजी द्वारकादास लोहिया व सौ. शैला लोहिया यांच्या उपस्थितीत पन्नालालजी सुराणा यांच्या हस्ते केले.
त्यानंतर काही वर्षे आम्हाला व बाबांना निर्विवाद आदर्श वाटलेल्या, विशेषत: ग्रामीण भागातून निष्ठेने कार्य करणाऱ्या, ज्यांना कधी कुणी सन्मानित केले नव्हते, तरीही त्यांच्या निष्ठा कोमेजल्या नव्हत्या त्या शिक्षकांचे सन्मान, सत्कार मान्यवरांच्या हस्ते आम्ही केले. मात्र, व्याख्यानांना व शिक्षक सत्कार समारंभांना वरचेवर अनुत्सुक होत चाललेली उपस्थिती पाहता दरवर्षी मग जोधाप्रसाद मूक बधीर विद्यालयात बाबांच्या स्मृतीदिनाचे आयोजन केले.
व्यक्ती गेली, कि तिचे कार्यही जाते; विस्मरण होते. असे निर्मळ मनाने काम करणाऱ्या बाबांचे आणि त्याचबरोबर त्यांच्यासारख्या अंधारात राहून आपले काम निष्ठेने, संवेदनेने करणाऱ्या असंख्यांचे न व्हावे, त्यांची तळमळ जिवंत रहावी या हेतूने हा परिपाठ आम्ही श्राद्धादि प्रथांना डावलून ठेवला आहे. याच हेतूने अगोदर बाबांच्या नावे स्मृती समारोह समिती या नावाने एक ट्रस्ट स्थापण्याचाही संकल्प केला. त्याचेच अधिकृत रूप म्हणजे ‘सुधाकरराव कुलकर्णी स्मृती प्रतिष्ठान’. त्यांच्या जन्मगावी – पानगाव ता. रेणापूर जि. लातूर – या प्रतिष्ठानचे मुख्यालय केले. त्यानिमित्ताने आमचीही आमच्या मातीशी नाळ जोडली जाईल आणि आसपासच्या खेड्यांशी आपल्याला जोडून घेता येईल हा उद्देश. पानगावचे त्यांचे किशनराव भंडारे, व्यंकटराव अनामे, अरविंद फुलारी, कालिदास पाठक यांच्यासारखे अनेक मित्रवर्य त्यासाठी आमच्या पाठीशी आहेत.
या भागातील – विशेषत: ग्रामीण भागातील – समस्या कोणत्या आहेत आणि त्यावर प्रबोधन, सहभाग आणि सहकार्य या त्रिसूत्रीने, तरुणांच्या आणि ज्येष्ठांच्या साथीने कहीतरी करता येईल, हाही मानस आहे. मुख्य उद्देश्य सर्वंकष शिक्षणचळवळीस साह्यभूत प्रतिष्ठानचे कार्य असावे, हा असला तरी शिक्षण हे सामाजिक प्रश्नापासून वेगळे करता येत नाही. आपल्या समाजात तर अनेकविध घटकांनी शिक्षण प्रभावित होत असते. अनेक पातळ्यांवर त्याचा विचार करावा लागतो. त्यात अगदी वरकरणी असंबद्ध वाटणाऱ्या आरोग्य, कृषि, व्यवसाय, भौगोलिक वातावरण व सांस्कृतिक जडणघडण अशा अनेक बाबींचा समावेश असतो. त्यामुळे अनेक आव्हानेही उभी राहतात. त्यात आपल्याही स्नेहपूर्ण अनुबंधाने आणखीही खूप काही करता येईल. बघू काय काय जमतं ते ! सहकार्य असू द्या, एवढीच नि:संकोच मागणी आहे.
प्रा. डॉ. संतोष कुलकर्णी
सचिव, सुधाकरराव कुलकर्णी स्मृती प्रतिष्ठान, पानगाव,
४३१ ५२२ ता. रेणापूर, जि. लातूर संपर्क : ८३२९० ३२१६४ / ७५८८०६२५४६
ईमेल पत्ता : skspratishthan@gmail.com